औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीत यावेळी अपक्षांची संख्या सर्वाधिक राहिली. त्याच बरोबर चौरंगी लढतीने सर्वच पक्षात बंडखोरी झाल्याचे दिसून आले. आता हाच पायंडा विधानसभा निवडणुकीतही गिरवला जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौरंगी ते बहुरंगी लढती झाल्या तर बंडखोरांची लॉटरी लागू शकते. त्यामुळेच अनेकांनी पक्षाने तिकीट दिले तरी अन नाही दिले तरी लढणार असे म्हणणारांची संख्या मोठी आहे.
विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिण्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी चालल्याचे दिसते. काँग्रेस -राष्ट्रवादी, भाजप- शिवसेना या प्रमुख पक्षांसह यावेळी वंचित आघाडीचा करिष्माही विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वंचित आघाडीकडे उमेदवारी मागण्यासाठी रांगा लागल्या आहेत. बहुजन समाज पार्टीच्या धर्तीवर वंचित आघाडी जिल्ह्यात सोशल इंजिनिअरिंगवर भर देणार असल्याचे समजते. जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात वंचित आघाडी उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रमुख पक्ष्यांचे वंचितच्या इच्छुकांवर बारीक लक्ष राहणार यात शंका नाही. शिवसेनेतही उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडी नंतर सेना आता भाजपाच्या मतदारसंघाबाबत काय भूमिका घेते हे पहावे लागेल. भाजपच्या वाट्याला गेलेल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी सेनेकडून अनेक जण इच्छुक आहेत. लोकसभेचा वाद-विवाद शमला नाहीतर सेनेची नाराजी भाजपला महागात पडेल एवढे मात्र नक्की ! दुसरीकडे भाजप कडेही इच्छुकांची संख्या डोकेदुखी ठरण्या एवढी वाढली आहे. शहरातील तीन मतदारसंघावर डोळा असलेल्यांची संख्या पाहता तिकिटासाठी अत्यंत चुरस निर्माण होईल यात शंका नाही.
दिले तरी लढवून नाहीतरी लढूच
दरम्यान, लोकसभा निवडणूक पारंपारिक राजकीय गणिते बिघडवणारी ठरली. आ. हर्षवर्धन जाधव यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक जणांनी पक्षासोबत चेकमेट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्वतःच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्यांची संख्या नोंद घेण्याएवढी असणार यात शंका नाही. पैठण, गंगापूर, वैजापूर, फुलंब्री, सिल्लोड या ग्रामीण पट्ट्यात पक्षाने तिकीट दिले तरी लढू नाही दिले तरी लढूच असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांपुढे बंडखोरांचे मोठे आव्हान उभे ठाकणार यात शंका नाही.
बहुरंगी लढतीने अनेकांना संधी
दरम्यान, अनेक जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी सभापती, माजी अध्यक्ष यासह छोट्या राजकीय पक्ष- संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. गावोगावी मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली जात आहे. तर अनेकांनी वेगवेगळ्या विषयावर आंदोलने हाती घेतले आहेत. विधानसभा निवडणूकीत चौरंगी अथवा बहुरंगी लढती झाल्या तर या बंडखोरांना संधी मिळू शकते, यात शंका नाही.